Search
  • Sharada

गटारी स्पेशल अंडा करी (अंडा मसाला रस्सा भाजी)

नमस्कार, आता श्रावण सुरु होणार आहे, मग सगळ्यांची नॉनव्हेज खाण्यासाठीची लगबग चालू असेल, पण सध्याची परिस्थिती बघता बाहेर जाणे टाळून घरीच कसे काही छान करता येईल का? ज्याने आपले नॉनव्हेज खाणे पण होईल... मग अशातच मला सुचली एक नवीन रेसिपी, अंडा करी (अंडा मसाला रस्सा भाजी). चला तर मग बघू या कशी करायची हि नवीन प्रकारची अंडा करी (अंडा मसाला रस्सा भाजी).


साहित्य :

मसाला साहित्य:

कांदा, किसलेले खोबरे, लसूण, आले ,२-३ हिरवी मिरची, कोथिंबीर, २-३ चमचे धणे, तीळ, २-३ लवंग, मिरे, तेजपान इत्यादी.


मसाला पेस्ट कृती:

कांदा लांब आणि पातळ कापून तव्यावर लालसर भाजून घ्या, भाजून झाला कि तो तव्यावरून मिक्सर च्या भांड्यात काढून घ्या आणि थोडा गार होऊ द्या. तोपर्यंत तव्यावर किसलेले खोबरे भाजून घ्या. २-३ चमचे धणे, तीळ, २-३ लवंग आणि मिरी पण परतून घ्या. हे सगळे पदार्थ आणि लसूण, आले, हिरवी मिरची, तेजपान, चिरलेली कोथिंबीर मिक्सीमधून छान फिरवून त्याची पेस्ट तयार करून घ्या, कि झाली आपली मसाला पेस्ट तयार.


भाजी साहित्य :

तेल, जिरे, हिंग, आपण तयार केलेली मसाला पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, थोडा चिकन सुहाना मसाला (असेल तर), मीठ, अंडे (उकडलेले नको), कोथिंबीर इत्यादी.


भाजी कृती:

कढईत ३-४ चमचे तेल घ्या, त्यात जिरे आणि हिंग घालून फोडणी करा. त्यात आपण तयार केलेली मसाला पेस्ट घालून छान परतून घ्या, त्या मसाल्याला थोडे तेल सुटले कि त्यात २-३ चमचे लाल तिखट, गरम मसाला आणि चावीप्रमाणे चिकन सुहाना मसाला घाला आणि मस्त परतून घ्या. त्यात थोडे गरम पाणी घालून त्याला छान तेल सुटू द्या, तेल सुटले कि त्यात १-२ ग्लास पाणी टाकून चवीप्रमाणे मीठ घाला आणि त्याला छान उकळी येऊ द्या. उकळ आली कि त्यात कच्चे अंडे एक एक करून फोडून टाका (टिप: अंडे उकडलेले नको, अंडे एकाच जागी फोडून नाही टाकायचे, वेगवेगळ्या जागी टाकायचे आणि त्याला पळीने हलवायचे नाही) १०-१५ मिनिट भाजीला कमी गॅसवर छान उकळी येऊ द्या म्हणजे अंडे त्यातच छान शिजते, ते शिजत असतांना पळीने हलवू नका. आता त्यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. अश्याप्रकारे नवीन प्रकारची, गटारी स्पेशल, मस्त गरमा गरम अंडा करी (अंडा मसाला रस्सा भाजी) तयार. हि करायला अगदी सोपी आहे आणि चवीला खुपच छान लागते, कारण अंडे हे भाजीतच शिजल्याने त्यात छान मसाले मिक्स होतात आणि चवीला देखील मस्त मसालेदर भाजी लागते, अगदी चिकनच्या भाजी प्रमाणेच. तर नक्कीच ट्राय करा.


आपल्याला हि रेसिपी आवडली असेल तर माझा हा ब्लॉग नक्कीच शेअर आणि लाईक करा.


118 views0 comments