Search
  • Sharada

भाकरीचा पिझ्झा (आजी ची मसाला भाकरी)

नमस्कार, माझी पहिली फूड पोस्ट पण कोणती रेसिपी सेंड करू हे कळतच नव्हते, मग आठवली आजीची मसाला भाकरी (भाकरीचा पिझ्झा), मी लहानपणी गावी गेली कि आजीची ती मसाला भाकरी खायला खूपच आवडायचे. आजी म्हणायची हेल्दी नाश्ता केला कि दिवस छान जातो. चला तर मग आजी ची ही रेसिपी बघूया.


साहित्य :

बाजरी किंवा ज्वारीची भाकरी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथंबीर, कांदा लसूण मसाला किंवा आपल्या घरी तयार केलेली शेंदण्याची चटणी किंवा लसूण चटणी, उडदाचा पापड भाजलेला, तेल, चवीप्रमाणे मीठ इत्यादी .

कृती :

बाजरी किंवा ज्वारीची फुललेली भाकरी भाजून झाली कि ती तव्यावर ४-५ मिनिट राहू द्या म्हणजे भाकरी छान कुरकुरीत होईल.

त्यानंतर भाकरीचा फुललेला भाग (पापुद्रा) अलगद वेगळा करा पण तो तुटणार नाही याची काळजी घ्या. भाकरीचा खालचा भाग प्लेट मध्ये ठेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा लसूण मसाला किंवा आपल्या घरी तयार केलेली शेंदणा चटणी किंवा लसूण चटणी पसरवा आणि त्यावर चवीप्रमाणे मीठ घाला. एका पापड चा चुरा करून तो पण भाकरीवर पसरवून घ्या. हे सगळे झाले कि त्यावर कोथंबीर टाकून घ्या.

आता फोडणी पात्रात २-३ चमचे तेल घालून ते थोडे गरम झाले कि भाकरीवर सगळी कडे टाकून घ्या आणि भाकरीचा फुललेला भाग, जो आपण वेगळा केला होता, तो त्यावर ठेवून छान दाबून घ्या. तर अशाप्रकारे झाला आपला भाकरीचा पिझ्झा तयार. खायला खूपच टेस्टी आणि पौष्टिक.

आपल्याला हि रेसिपी आवडली असेल तर माझा हा ब्लॉग नक्कीच शेअर आणि लाईक करा.


#BhakariChaPizza #MasalaBhakari #HealthyNashta141 views0 comments